Sunday, July 11, 2010

हे राष्ट्र देवतांचे (He Rashtra Devatanche)

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी, सीता-रघुत्तमाची
रमायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला, येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला, गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी, भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी, या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी, नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो, जयगीत जागृतीचे
.-----ग. दि. माडगूळकर

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...